गोल आणि वर्तुळ! आकारसाधर्म्य असणाऱ्या या दोन आकृत्या भौमितिक दृष्ट्या मात्र भिन्न आहेत. वर्तुळ द्विमितीय आहे तर गोल हा त्रिमितीय. केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा समुदाय दोन मितीत असला की त्याला वर्तुळ म्हणतात आणि तीन मितीत असला तर त्याला गोल म्हणतात. पण दैनंदिन जीवनात मात्र आपण या दोघांचा एकच असा उल्लेख करतो. गोल! त्याच्या पृष्ठभागावर एका बिंदूपासून सुरुवात केली आपण चालायला तर पुन्हा त्याच बिंदूला येऊन पोहोचतो. सतत त्याच त्याच मार्गावरून फिरत राहतो आपण गोलाकार वर्तुळाकार. जन्म जरा मरण आणि पुन्हा जन्म आयुष्याचं हे चक्र असंच चालू आहे अखंडित अविरत. चक्र वर्तुळाकार म्हणजे गोलच की! आपला जन्म होतो तोच मुळी आईच्या गोल अशा उदरात. तिच्या गोलाकार स्तनातून पाझरणाऱ्या अमृताचे पान करीतच आपण मोठे होतो. गोल वर्तुळ त्याचा परीघ आणि त्या परिघात येणाऱ्या अनेक गोष्टी, वस्तू आणि माणसं ही सारी आपलीच तर असतात. आपण केंद्रस्थानी राहून त्यांना एका ठराविक अंतरावर ठेवतो अगदी आपल्याही नकळत! गोल काहीवेळा तो भरीव असतो आणि काही वेळा पोकळ असतो. आपल्या डोक्यासारखा! काहीवेळा उगाचच अनेकानेक विचारांनी न...