काल सहज सुधा मूर्तींचा एक लेख वाचनात आला. 'विशीतील आदर्शवाद आणि चाळिशीतील वास्तवतावाद'! खरंच आहे ऐन उमेदीत विशीत आपण फारच आदर्शवादी असतो. तारुण्यातील उसळणारं रक्त असेल, नुकताच लागलेला शैक्षणिक स्वातंत्र्याचा वारा असेल किंवा अनुभवांची तोकडी शिदोरी असेल ; कारण काहीही असेल पण त्या वयात आपल्या कल्पना फारच आदर्शवादी असतात हे खरं! त्याउलट चाळीशीत आपण वास्तव स्वीकारायला सुरुवात करू लागलेले असतो. शिक्षण आणि त्याचे उपयोजन यातील दरी सांधत सांधत जीव मेटाकुटीला आलेला असतो. अनुभवांचं बऱ्यापैकी मोठं आणि जड गाठोडं आता आपल्यापाशी असतं. नोकरी-धंद्यातलेच नाही तर वैयक्तिक आयुष्यातसुद्धा अनेक चढ उतार सहन करून पोळलेले आपण आदर्श सोडून हळूहळू वास्तव स्वीकारायला लागलेले असतो. आता हे स्वीकारणं काही वेळा जड जातं पण स्वीकारण्यवाचून गत्यंतर नसतं. मागे वळून पाहताना आपल्याच लक्षात येतं की आपण स्वतःविषयी फारच अवास्तव कल्पना बाळगल्या होत्या आणि कितीही काहीही केले तरी पूर्ण होणे शक्य नाही. काही जण हे वास्तव सहज स्वीकारतात तर काही जणांना फार त्रास होतो वास्तव स्वीकारताना. पण हे वास्तव स्वीकारणं म्हणजेच स...