Skip to main content

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात.

प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात.

सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत.

ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात.

काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आली तर बरं झालं असतं वगैरे वाटण्या इतपत आपण त्यांचा तिरस्कार करतो. याउलट काही माणसं आपल्याला सतत आपल्यासोबत हवी असतात. पण दुर्दैवाने नेमकी तिच दुरावतात या ना त्या कारणाने. ज्यांच्याशी आपली तार जुळते ती मंडळी अगदी मरते दम तक साथ देतात आणि अगदीच साथ सोडावी लागणार असेल तर चुटपुट लावून जातात जीवाला आपल्या आणि स्वतःच्याही. मनाचा एक कोपरा कायमचा हळवा करून exit घेतात.

किती प्रकारची, स्वभावाची, रंगांची, भाषा जाणणारी माणसं आपण आभूषणांप्रमाणे वागवत असतो. जितकी आभूषणे अधिक तितकं आपलं जीवन अधिक समृद्ध होत जातं. आयुष्यात जर काही शाश्वत असेल तर हेच आहे ते म्हणजे हा लोकसंग्रह.

हा विचार सुरू असतानाच तिरक्या बुद्धीने त्याला छेद दिला. आपणही कोणाच्या तरी आयुष्यरूपी नाटकातील एक पात्र असणार. आपली पण entry आणि exit असणार. ती फक्कड जमवणं एवढंच काय ते आपल्या हातात. आपल्याला आपल्या नाटकातल्या पात्रांनी कशी entry घेतलेली आवडेल तशीच किंवा त्याहूनही सरस अशी आपण entry घ्यावी. Entry लाच भरपूर टाळ्या पडाव्यात आणि exit हुरहूर लावून जावी. बास हे एकच गणित जमावं. मग सगळं कसं आपोआप प्रकाशमान होईल....

© उमा जोशी ०७/१२/२०१९

PC: Google.

Comments

Popular posts from this blog

              प्राजक्त......                  प्राजक्त किंवा पारिजातक एक स्वर्गीय फूल. हिंदू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी एक.  लहानसा केशरी देठ आणि स्वच्छ शुभ्र पाकळ्यांचं हे नाजूक फूल आत्यंतिक सुवासिक असतं. केशरी देखाच्या काही छटा या शुभ्र पाकळ्यांवर पण उमटतात कधी कधी. अत्यंत सुरेख सुगंध, मन प्रसन्न करणारा.                 माझ्या बालपणी मुंबईत आमच्या सोसायटीमध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं. आम्ही बऱ्याच जणी त्याची फुलं वेचायचो. आपल्याला अधिक मिळावीत म्हणून दुसरीला चुकवून लवकर जाणे वगैरे उद्योगही केले. लग्नानंतर सासरी आले. माझं सासर कोकणात त्यामुळे घर; त्याच्या पुढेमागे अंगण सगळं कसं अगदी साग्रसंगीत. घरात प्रवेश करतानाच वाटेवर हा पारिजातक उभा आणि पायाशी प्राजक्तसडा.. त्याक्षणी अगदी राणीच आहोत आपण असं वाटलं..                 तर असा हा मनाला भुरळ घालणारा पारिजातक. त्याने भामेलाही भुरळ घातली आणि कृष्ण...

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं. खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी. घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली. अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत ...

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!                        वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.                        मयुरेश पंडित माझा स...