शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.
मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.
तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वतःचं मूल असेल तर जरा तरी आशा की हे मूल आपल्याला चांगले दिवस दाखवील नाहीतर सगळाच अंधार.
तर आता मी बाई का म्हणाले यावर येते. ही खूप क्लिष्ट गोष्ट आहे. अजूनही इतके शिक्षित प्रगत स्वायत्त होऊनही आपण बाईच्या बाईपणाबद्दल मोकळेपणाने बोलत नाही किंवा ते स्वीकारत नाही मग मी म्हणतेय तो काळ तर खूपच मागचा आहे.
हे लिहावं असं वाटायला लागण्यासाठी कारण झालं ते कलर्स मराठीवर लागणारी जय जय स्वामी समर्थ ही मालिका.
या मालिकेत अशीच एक अलवणातली बाई आहे. तिच्या नातवाचे मित्र मैत्रिणी जमून बाहुला बाहुलीचे लग्न लावतात आणि पंगतीचा आनंद घेतात. जेवणात विशेष काय तर बोरे! या बाईला तिची मुलगी आत ग्लासातून दूध नेऊन देते तेव्हा ही बाई म्हणते "तुलाही नाही नं वाटलं चार बोरं आईला द्यावीत म्हणून." तिला हे लागतं. ती म्हणते देखील की लोक म्हणत असतील राधाक्काला किती सोस प्रपंचाचा. पण काय करू कितीही समजूत घातली तरी मन ऐकत नाही.या प्रसंगातून त्या बाईची पराधीनता कळते. क्षुल्लक बाब चार बोरे पण त्यातून तिची हतबलता दिसते.
तरुण वयात वैधव्य आलं असेल तर शरीर भरू नये, रूप निखरू नये आणि लोकांची वाईट दृष्टी पडू नये म्हणून अशा बायकांना एकभुक्त राहण्याचं व्रत दिलं जायचं. तिचे केशवपन करायचे ज्या योगे ती विद्रुप होईल पण शरीराच्या भुकेला फक्त शरीर हवं असतं रूप नाही हे सहज दुर्लक्षिलं जायचं. या बाईला नसतील का देहाच्या हाका? अनेकदा कुटुंबातीलच पुरुषांनी म्हणजे नातलगांनी या बाईचा शारीरिक वापर केलेला आढळून आलाय. काही वेळा तो सहमतीनेही असेल काय माहीत?
सुबोध भावेचा लोकमान्य टिळक रंगवलेला चित्रपट आठवा. त्यात एक मुलगी सासरी जायचं नाही म्हणून धावत धावत येऊन आगरकरांच्या मागे लपते आणि अशीच एक अलवणातली बाई तिच्यामागे धावत येते. आगरकर तिला विचारतात ही का जायला नाही म्हणते? तर ती बाई सांगते की हीचा नवरा राक्षस आहे राक्षस पण बाई आधी आधी जे नको वाटते तेच नंतर नंतर हवं वाटतं. यावेळी तिच्या चेहऱ्यावरून आणि डोळ्यातल्या भावांवरून शरीराच्या भुकेची तडफड जाणवते.
फक्त शरीराची भूक हाच माझा मुद्दा नाहीये तर माणूस म्हणूनही तिला जगताना खूप अडजस्टमेंट्स कराव्या लागायच्या. दिराच्या, भावाच्या कुटुंबाला आपलं कुटुंब मानून कायम खपत राहणारी ही बाई क्रेडिट मिळायच्या वेळी मात्र अगदी सहज डावलली जायची. पण ही सगळी अवहेलना सहन करून पुन्हा उद्या त्याच जोमाने कामाला लागणारी अशी ही अलवणातली बाई...
हा शाप नंतरच्या काळात सरला पण बाईचं बाईपण काही सरलं नाही. आजही परित्यक्ता, घटस्फोटित किंवा विधवा स्त्री ही जरी आर्थिक स्वायत्त असली तरी एकटी स्त्री म्हणजे available असा शिक्का वागवताना दिसते. अनेक अवहेलना आजही तिला सहन कराव्या लागतात. त्यातल्या त्यात विधवेला जरा थोडी बरी वागणूक मिळते पण घटस्फोटित किंवा परित्यक्ता म्हणजे सहज सावज असाच समज समाजाचा आहे असं अनेक घटनांमधून दिसून येतो. फरक इतकाच की अलवण गेलं पण अवहेलना मात्र गेली नाही.
बघा पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या.....
© उमा जोशी २२/०२/२०२१

खूप भावनिक आणि सामाजिक जाणिवेतून मांडलं आहे. पूर्वीच्या काळात असलेली तीव्रता आज थोडी कमी आहे. मात्र, प्रश्न कायम आहे..
ReplyDeleteधन्यवाद
DeleteSuperb Uma!
ReplyDeleteVery Nice post! मनामनात खदखदणारं वास्तव तू समोर आणलंस...
अतिशय उत्कृष्ट प्रकारे...
This comment has been removed by the author.
ReplyDelete