Skip to main content
सावळा.......
सावळा, ना काळा ना गोरा असा तो म्हणजे सावळा. या वर्णाला एक खूप सुंदर, प्रिय, लडिवाळ, खोडकर तरीही आश्वासक अशी एक किनार आहे एका नावाची. अगदी बरोब्बर ती किनार म्हणजेच ते नाव म्हणजेच कृष्ण!
               किती रूपं, किती छटा त्या मधुसूदनाच्या! श्रीकृष्ण संपूर्ण भारतवर्षाचं आराध्य दैवत! तो मनमोहन सर्वांना असं काही मोहून टाकतो की आपण त्याच्यात कधी गुंतलो हे कळतच नाही. हा घनश्याम कधी दुडदुड रांगणारा बाळकृष्ण असतो तर कधी यमुनातीरी मित्रासमावेत खेळणारा नंदलाल असतो. कधी गाईंसोबत वनात रमणारा वनमाळी तर कधी पाव्याची मधूर तान ऐकवणारा मुरलीधर. कधी गोकुलवासीयांच्या रक्षणार्थ गोवर्धन उचलणारा गिरीधर तर कधी कालियामर्दन करणारा कान्हा. हाच तो ज्याने कंस वधून मथुरेला मोकळा श्वास घेऊ दिला आणि हाच तो ज्याने हा मोकळा श्वास टिकावा म्हणून मथुरा सोडली आणि द्वारका बसवली आणि सोबत मिळवली एक पदवी, रणछोडदास! तरुणाईला भावणारा प्रियकर, वृद्धांना आवडणारा योगेश्वर ही सर्व रूपे त्याचीच तर आहेत!
               कर्णाच्या औदार्याचे कौतुक करत असतानाच "तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?", असा परखड सवाल उठवणारा सुद्धा तोच. अर्जुनाला महायुद्धाला प्रेरित करणारा पण तोच आणि दुर्योधनाला युद्धापासून परावृत्त करणाराही तोच!
               कृष्ण! नुसतं उद्गारलं जरी हे नाव तरी कानात मंजुळ बासरीचे स्वर गुंजतात. सज्जनांना वाट दाखवणारा, दुर्जनांची वाट लावणारा एक वाटाड्या. फक्त द्वापारयुगामध्येच नाही तर कलियुगातही आपल्याला तोच वाट दाखवतो त्याने सांगितलेल्या गीतेतून. अनेक प्रसंग अनेक निर्णय घेताना याचीच मदत अनेकांनी घेतली आहे, घेत आहेत आणि घेत राहतीलही.
               तसं बघायला गेलं तर प्रभू श्रीराम सुद्धा विष्णूचाच अवतार! त्यांचीही प्रतिमा सावळीच. परंतु त्यांच्या प्रतिमेच्या मागोमाग येतो तो आदरभाव, कर्तव्यदक्षाता, वचनप्रियता, सत्याचा घोष आणि या सावळ्याच्या प्रतिमेसोबत येतो तो प्रेमभाव, कृष्णनीती(गरज असेल आणि दुसऱ्याचं फार नुकसान होतं नसेल तर खोटं बोलायला परवानगी), अल्लडपणा, लडिवाळ गोड हास्य! प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम तर श्रीकृष्ण हा पूर्णावतार!
               पण या पूर्णावताराला त्याच्या जीवन प्रवासात कधीतरी कोणाची तरी गरज भासली असेलच ना जशी आपल्याला त्याची भासते. तेव्हा त्याने काय केले असेल? नक्कीच त्यांचं एकूण चरित्र पाहता योग्य व्यक्तीचा सल्ला, मदत घेतलीच असणार.
               गोरा आणि काळ्याच्या मधला सावळा! तसंच काहीसं नाही का या दामोदराचं सारं आयुष्य? अनेकदा सत्य जिंकावं म्हणून थोड्याशा असत्याची घेतलेली मदत, योग्याचा विजय व्हावा म्हणून अयोग्याचा केलेला पाठपुरावा. हेच तर सांगतोय तो आपल्याला की कधीच सगळं गोरं किंवा सगळं काळं, सगळं बरोबर किंवा सगळं चूक असं नसतंच बऱ्याचदा त्याच्या मधलंच असं ते सावळ असतं. चित्ताकर्षक,हुरहूर लावणारं! म्हणूनच तर जगण्याला एक उमेद असते आनंद असतो ओढ असते जगण्याची!
               सावळ्याच्या रंगात रंगुनी सारे,
               जग हे वाटे सावळे गोजिरे।
               सावळ्याच्या बासरीचे स्वर,
               घुमती मनी सोजिरे।
               सावळ्याच्या ओढीने जाऊ त्या दिशेला,
               अन परतून येऊ घेऊन एक दिलासा,
               लढण्याचा, जगण्याचा ,परत परत
               पुन्हा पुन्हा।।
©उमा जोशी


Comments

Popular posts from this blog

              प्राजक्त......                  प्राजक्त किंवा पारिजातक एक स्वर्गीय फूल. हिंदू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी एक.  लहानसा केशरी देठ आणि स्वच्छ शुभ्र पाकळ्यांचं हे नाजूक फूल आत्यंतिक सुवासिक असतं. केशरी देखाच्या काही छटा या शुभ्र पाकळ्यांवर पण उमटतात कधी कधी. अत्यंत सुरेख सुगंध, मन प्रसन्न करणारा.                 माझ्या बालपणी मुंबईत आमच्या सोसायटीमध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं. आम्ही बऱ्याच जणी त्याची फुलं वेचायचो. आपल्याला अधिक मिळावीत म्हणून दुसरीला चुकवून लवकर जाणे वगैरे उद्योगही केले. लग्नानंतर सासरी आले. माझं सासर कोकणात त्यामुळे घर; त्याच्या पुढेमागे अंगण सगळं कसं अगदी साग्रसंगीत. घरात प्रवेश करतानाच वाटेवर हा पारिजातक उभा आणि पायाशी प्राजक्तसडा.. त्याक्षणी अगदी राणीच आहोत आपण असं वाटलं..                 तर असा हा मनाला भुरळ घालणारा पारिजातक. त्याने भामेलाही भुरळ घातली आणि कृष्ण...

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं. खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी. घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली. अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत ...

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!                        वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.                        मयुरेश पंडित माझा स...