Skip to main content
वळण....           
                   वळण, ज्याला हिंदीत मोड म्हणतात आणि इंग्लिशमध्ये टर्न म्हणतात. हो तेच ते शब्द अनेकदा वापरतो आपण. पण असं असूनही घाबरतो त्यांना सामोरे जाताना.
                    वळणा वळणाने होणारा घाटातला प्रवास कोणाला सुख देतो तर कोणाला त्रास. वळण दिशा बदलतं, प्रवाह बदलतं अनेकदा योग्य मार्गावर आणून सोडतं.
                    आपण वळणावर थोडे थांबतो, अवघडतो, किंचितसे साशंक होतो. का ? मला वाटतं त्याचं कारण असावं वळणापालिकडे बघता न येण्याची आपली मर्यादा. या वळणापालिकडे आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय हे माहीत नसल्याने सतत धाकधूक असते मनात. पण म्हणून वळणं टाळता येणार नाहीत. किंबहुना ती टाळूच नयेत असं मला वाटतं. प्रत्येक वळणावर नवीन काहीतरी शिकायला मिळतं. यश मिळतं नाहीतर अनुभवाचं गाठोडं तरी वाढतच.
                    असं हे वळण आपल्या आयुष्यात काही वेळा वादळ पण निर्माण करते. काय चूक काय बरोबर हेच कळेनासे होते. सर्व जग धूसर बनून जातं. कोण आपलं कोण परकं हेच कळत नाही किंवा फारच नीट कळतं.
                    वळण ओलांडणं हे जसं कसब आहे तसच ते ओलांडल्यावर अनुभव साठवणं हे पण एक कसब आहे. अनेकदा थ्रिल हवं हवं म्हणून आपणच वळणं निर्माण करतो आपल्या आयुष्यात. नाही का? आणि ही अशी उत्पन्न झालेली वळणं पार करताना आपली नक्कीच जरा जास्तच दमछाक होते.
                    पण नंतर वळणावरून मागे वळून पाहताना आपल्याला दिसतो तो कॅलिडोस्कोप. विविध पॅटर्नसचा. भावनांचे, कृतींचे, नात्यांचे, प्रेमाचे, आपुलकीचे, मित्रत्वाचे, वैराचे सुद्धा. आणि हेच विविध पॅटर्नस आपल्याला बळ देतात पुढल्या वळणावर पार व्हायला.
                    वळणावरून काही वेळा परत फिरुया असं वाटतं. यू टर्न घेऊयात का? असही वाटत असतं. काही वेळा तो निर्णय योग्यही असतो पण जीवन म्हणजे पुढे पुढे जाणेच ना. मग वळणाला घाबरून किंवा अवघडून किंवा कंटाळून about turn का घ्या? वळणावरून पुढे होऊ. कोण जाणे पुढचं वळण सुखद असेल हवं हवंसं असेल!
                    असा हा आपला वळणावळणाचा प्रवास एका अशा वळणावर येऊन थांबतो की जिथून परतीची वाट नाही. या वळणावर जीवनाची सार्थकता ज्याला पटली त्याचे जीवन सफल झाले. अशाच व्यक्ती आदरणीय आणि अनुकरणीय ठरतात. नाही का?
                    खूप वळणदार प्रवास करत करत अंताकडे येताना जरा दमला असाल तर या जरा या वळणावर विसावूयात!
©उमा जोशी..



PC: Google

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...