Skip to main content

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!
                       वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.
                       मयुरेश पंडित माझा सहकारी तो पण येणार आहे असं कळलं तर त्यांच्यासोबतच रिक्षेने रेल्वे स्टेशन ला पोचलो. तिथे वल्लभ, गिरीश साठे आधीच आले होते. मी, मयुरेश आणि रेश्मा( ही MA करतेय इतिहास विषयात) पोचलो आणि अजून एक मेम्बर यायचाय असं कळलं सो गप्पा मारत तिथेच उभे. तो राहिलेला मेम्बर म्हणजे मिथिला हॉटेलचे मालक श्री. शानभाग (वल्लभ त्यांना विवेकदादा म्हणाला तर आता आम्हीपण तेच म्हणू) ते आले आम्ही रत्नागिरी-दादर पॅसेंजर पकडायला प्लॅटफॉर्मवर उतरलो. छान जागा मिळाली आणि गप्पांना सुरुवात झाली. मी आणि वल्लभ खूप दिवसांनी भेटत होतो त्यामुळे विषय खूप होते आणि त्यात मयुरेश पण सामील झाला. तिकडे गिरीश आणि विवेकदादा यांचं काहीतरी सुरू होतं. डब्यातले बाकीचे प्रवासी आमच्या आवाजाला ( म्हणजे माझ्याच ) कंटाळले असणार.
                       प्रवास सुरू होता आणि आश्चर्य म्हणजे पॅसेंजर कुठेही क्रॉसिंग न लागता जात होती पुढे. वल्लभ पण म्हणाला,"उमा तू येत जा. तू लकी आहेस. अजिबात क्रॉसिंग लागलं नाही." बाहेर छान धुक्याची दुलई होती सर्वत्र. खूप सुरेख दिसत होतंआणि गप्पाही छान सुरू होत्या. त्यातच वीर स्टेशनवर मानसी भिडे आम्हाला जॉईन झाली. ती पण आमच्याच कॉलेजची विद्यार्थिनी त्यामुळे तोंडओळख होतीच. गप्पा सूरु असतानाच इंदापूर आले व आम्ही उतरलो आणि आदित्यची वाट पाहत तिथेच थांबलो तो मुंबईहून आम्हाला जॉईन होणार होता. तो येईपर्यंत असाच tp आणि तो आला मग आम्ही बाहेर पडलो. अजूनही ट्रेकचा फील नव्हता आला. पिकनिकच वाटत होती. स्टेशन बाहेर एका छोटेखानी हॉटेलात पोहे चहा कॉफी असं होऊन आम्ही वाट धरली. रिक्षा करून आम्ही तळा गडाच्या पायथ्यापाशी जायचं ठरवलं. रस्ता बरा होता. भाताची शेतं पिकली होती. त्याचा पिवळा रंग डोळ्यांना सुखावत होता आणि एक सुवास त्यांचा दरवळत होता. दूरवर हिरवागार डोंगर दिसत होता. तोच तो तळगड आम्हाला साद घालत होता.
                       त्याच्या पायथ्याशी आल्यावर रस्ता विचारून आम्ही सुरू झालो चालायला. एक लोखंडी कमान पार करून चढणीला लागलो आणि जाणवलं आपण ट्रेकला आलोय. विवेकदादा आणि गिरीश सरावाचे असल्यासारखे पुढे गेले झपझप. मी आपली माझ्या चालीने सावकाश सुरू होते. वल्लभ आणि आदित्य आपले कॅमेरे सावरत सर्वात मागे होते फोटो काढत येत होते. बाकी मंडळी पण चढ चढत होती. दुसरी एक कमान आली त्याजवळ एक छोटी गंजलेली तोफ पाहायला मिळाली. पण एकच. आता मात्र चढण जाणवायला लागली आणि लक्षात आलं की मी दमलीये. त्या दमणे आणि चढणे या नादात आजूबाजूला छान हिरवळ सुंदर रानफुले बघणे राहूनच गेले माझे. म्हणजे ओझरतं पाहिलं पण आस्वाद नाही घेतला.
                       मध्येच एके ठिकाणी जरा टेकले तेव्हा वल्लभने अंधुक दिसणारा रायगड दाखवला तसाच मागच्या बाजूस असलेला घोसाळगड पण दाखवला. आता उंचीवरून आजूबाजूचा परिसर मोहक दिसत होता. मध्ये मध्ये वल्लभ गड , दगड, ठेवण, बांधणी याबद्दल सांगत होता. यावरून गडाचा कालावधी कसा ओळखायचा वगैरे पण सगळं समजावून देत होता. गोड वाटलं ऐकायला. असा इतिहास आवडेल तो पुस्तकातला नको वाटतो.
                       मध्ये एके ठिकाणी जरा सावली आणि बऱ्यापैकी ऐसपैस जागा होती जिथे आम्ही सर्वच विसावलो आणि पण वल्लभ मधला जाणकार आम्हाला माहिती देऊ लागला. गडाचे महत्व, संरक्षण, व्यापार, आर्थिक सत्ता केंद्र, एकमेकांत गुंतलेले सत्ताधरी आणि स्पर्धा हे सगळं खूपच रंजक होतं. त्या जागेवर म्हणे दरवाजा असावा. तिथे मारुतीरायाचे शिल्प आहे खोदलेले दगडात. त्याच्या पायाखाली कोणतीतरी राक्षसी असावी चिरडलेली. मारुती ही रक्षक देवता आहे त्यामुळेच तिला द्वारातच स्थान दिले असावे. त्याखालीच एक मोठी दगडी पणती पण आहे म्हणजे रोज तीथे  दिवाबत्ती होत असावी. तिथेच एक शरभ शिल्प आहे. त्यावरून या गडाचा काळ थेट देवगिरीचे साम्राज्य या काळात जातो. त्या काळात म्हणे हा बांधला गेला असावा. मस्त वाटत होत ते सगळं ऐकायला. असा इतिहास कधीच नव्हता ऐकला किंवा वाचला.
                       तिथून वर चढून गेलो. तिथे एक बुरुज लागला. त्याच्या भिंतीला खिडक्या आहेत. काही आहेत त्यातून तोफा डागत म्हणे आणि काही लहान आहेत त्यातुन बंदुका डागत. ही माहिती नवीनच होती मला. गडावर एक वन रूम किचन असावा असा राहायची सोय असलेला वडा भग्न अवस्थेत आहे. ध्वजस्तंभ आहे. त्याच ठिकाणी वॉच टॉवर पण आहे. आता मोडकळीस आलाय पण त्या उंचीवरून खूप दूरवर नजर ठेवणं नक्किच शक्य आहे. गडमाथ्यावर पाणी साठवण्यासाठीची टाकं आहेत, धान्याचे कोठार आहे, देऊळ कुठे नाही  दिसलं. खरं तर असायचं पण नाही दिसलं. कदाचित खूप वाढलेल्या गवतात लपलं असेल. गडमाथ्यावर पाण्याजवळ खूप फोटोस काढले आणि परत उतरणीला लागलो.
                       येताना जिथे बसलेलो तिथेच परत थांबलो आणि सोबतचा सुका खाऊ, सफरचंद वगैरे खाऊया असं करत करत पुन्हा वल्लभला ऐकू लागलो. त्याने तो गड कसा कसा कोणा कोणाच्या ताब्यात गेला मराठ्यांनी परत कसा मिळवला, सिद्दीने कसा कब्जा केला होता, चिमाजी अप्पांनी तो कसा परत मिळवला इत्यादी माहिती इतकी रंजकपणे सांगितली की वेळ कसा गेला ते कळलंच नाही. वल्लभने तर एक नकाशाच काढून त्या ठिकाणचे भौगोलिक महत्व तसच त्याकाळात असलेलं राजकीय महत्व सांगितलं. सगळी सत्ता स्पर्धा ही फक्त राज्य बळकवण्यापूर्ती नाही तर आर्थिक गणितानी पण चालतात हे नव्याने कळले. इंटरेस्टिंग होत्या या गोष्टी मला. सगळेच जण अगदी भक्ती भावाने ऐकत होतो. त्यातच त्या शरभ शिल्पाविषयीचा पुराणातील उल्लेख आणि त्यानिमित्ताने आलेली गोष्टपण सांगितली त्याने. मस्त वाटलं.
                       आता आम्ही पटापट उतरलो कदाचित वाट ओळखीची झाली असावी. उतरताना आजूबाजूला दिसणारे टॉवर्स कसे सौंदर्य खराब करतात वगैरे पण बोलणं झालं. खाली आलो एक ग्रुप फोटो पण झाला. आता माणगावला जायला बस नसल्याने आम्ही परत रिक्षानेच निघालो. माणगावात येऊन जेवलो आणि मानसीला पुण्याला जाणाऱ्या बस साठी स्टँड वर गेलो सोडायला. पण मेली एक पुणा बस येईल तर शपथ. शेवटी आमच्या रेल्वेची वेळ झाली तशी तिला तिथे सोडून आम्ही स्टेशनकडे निघालो. चार चारदा तिला सांगून की कळवं काय ते आणि कोणतीही रिस्क घेऊ नकोस नीट जा असं. स्टेशनवर आलो. तिकीट्स काढली आणि मत्स्यगंधेची वाट पाहत थांबलो. गाडी आली, चढलो, सुदैवाने जागा मिळाली बसायला आणि परतीचा प्रवास सुरू झालो. आता जो तो आपल्या कोशात हळूहळू शिरू लागला पण तरीही गप्पा होत होत्याच. वल्लभ आणि मी परत बऱ्याच वेगवेगळ्या गप्पा मारल्या काही गोष्टी उलगडल्या आणि शेवटी रत्नागिरीला आलो. परत मयुरेश सोबतच रिक्षेने परतले. मध्येच मानसीही सुखरूप पुण्याला घरी पोहचली अस कळलं त्यामुळे सुरेखसा असा तो दिवस सरला.
                       माझ्यासाठी तो फक्त एक ट्रेक किंवा किल्लादर्शन नव्हतं तर मला हवा असलेला अपेक्षित असलेला आणि अर्थातच आवडलेला असा एक चेंज होता. सदैव राहील हा दिवस माझ्या आठवणीत. थँक्स टू वल्लभ आणि सारे सोबती. परत परत भेटू आणि अजून अजून वाटा तुडवू....



PC: पाऊलखुणाचे सोबती...
© उमा जोशी
( ता. क. : कदाचित क्रम चुकला असेल किंवा विस्कळीत असेल लेखन. तरी सर्व गोड मानावे)

Comments

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...