Skip to main content

अंगणातली दुपार

अशीच एक मरगळलेली दुपार. घरातील सर्वच मंडळी जेवून जरा वामकुक्षी वगैरे साठी आडवी झालीत. पण तिला मात्र का कुणास ठाऊक आज झोप येतंच नव्हती. घरात कसतरीच वाटत होतं म्हणून ती उठली आणि सरळ अंगणात येऊन बसली, पडवीच्या पायरीवर.
                       दुपारचं हे निवांत अंगण तिने याआधी कधीच पाहिलं नव्हतं, अनुभवलं नव्हतं. थंडीच्या दिवसात अंगणातील झाडांच्या फांद्यांमधून येणारे उन्हाचे किरण खूपच हवेहवेसे वाटत होते. किती तरी प्रकारची झाडे लावली होती त्याने. आंबा, फणस, पोफळी, माड हे तर होतेच पण सोबत कितीतरी फुलझाडं पण. आंबा फणसाच्या फांद्यांच्या आडून दिसणारं ते छोटंसं आभाळ तिच्या मनाला खूप साद घालत होतं. माडांच्या सावळांतून येणारे सूर्यकिरण आल्हाददायक तसंच आश्वासकही वाटतं होते. सकाळीच शिंपण केल्यामुळे झाडांच्या बुंधात अजूनही ओलावा कायम होता. जसा तिच्या मनातही होता. मातीचा ओला वास, सूर्यकिरणांमुळे लकाकणारे पानांवरले पाण्याचे बिंदू खूप खूपच मोहक दिसत होते. रेंगाळलेला सूर्यनारायण खूप हवाहवासा वाटत होता जणू काही तो तिच्याशी गप्पा मारायलाच थांबला होता.
                       किती काय काय ते अंगण सांगत होतं! इथे खेळलेली मुले, कष्ट केलेली माणसे, माहेरच्या आठवणीने रडलेल्या सासुरवाशिणी, माहेरहून परत सासरी जाताना डोळे पाणावलेल्या माहेरवाशिणी, जीवनाची शेवटची यात्रा आणि नवसंजीवनाचा सोहळा सुद्धा!
                       घराला असणारं अंगण कोणतीही गोष्ट थेट घरात येऊ देत नाही. बरीचशी संकटं थोपवून ठेवतं अंगण! असंच एक अंगण आपल्याभोवती पण असतं, मन नावाचं. खूपशा गोष्टी ते आपल्यापर्यंत येऊच देत नाही स्वतःत साठवून ठेवतं. मधेच धडक देतं कधीकधी पण बऱ्याचदा सांभाळतच. या अंगणात पण अनेक झाडं आपण लावतो किती प्रकारची माणसे, अनेक पुस्तकं, अनेक प्रसंग खूप खोलवर मुळं रोवून.
                       आणि दुपार तिच्याविषयी काय सांगावं? फारशी कोणाची आवडती नसावी. मध्यान्ह समय, खूप काही करायचं अजून बाकी असतं. सकाळी घेतलेले निर्णय दुपारी अमलात आणायचे आणि त्याचं फळ चाखायचं संध्याकाळी. कष्टाला घाबरणार्यांना दुपार आवडत नसावी बहुदा. पण आयुष्याची संध्याकाळ निवांत जावी असं वाटणार्यांनी मात्र दुपार खूप आवडीने जगली पाहिजे व्यवस्थित नियोजनाने व्यतीत केली पाहिजे.
                     अंगणातली दुपार तिला खूप काही सांगून गेली तसच दुपारचं अंगणही खूप बोललं तिच्याशी. तीही बोलली तिच्या मनाच्या अंगणाशी, बागडली तिथे खूप आठवणींच्या सोबत आणि आयुष्याच्या दुपारी हळवी झाली एकटीने घालवायला लागणाऱ्या संध्याकाळीसाठी....
                       ©उमा जोशी
PC: तन्मय जोशी.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

              प्राजक्त......                  प्राजक्त किंवा पारिजातक एक स्वर्गीय फूल. हिंदू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी एक.  लहानसा केशरी देठ आणि स्वच्छ शुभ्र पाकळ्यांचं हे नाजूक फूल आत्यंतिक सुवासिक असतं. केशरी देखाच्या काही छटा या शुभ्र पाकळ्यांवर पण उमटतात कधी कधी. अत्यंत सुरेख सुगंध, मन प्रसन्न करणारा.                 माझ्या बालपणी मुंबईत आमच्या सोसायटीमध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं. आम्ही बऱ्याच जणी त्याची फुलं वेचायचो. आपल्याला अधिक मिळावीत म्हणून दुसरीला चुकवून लवकर जाणे वगैरे उद्योगही केले. लग्नानंतर सासरी आले. माझं सासर कोकणात त्यामुळे घर; त्याच्या पुढेमागे अंगण सगळं कसं अगदी साग्रसंगीत. घरात प्रवेश करतानाच वाटेवर हा पारिजातक उभा आणि पायाशी प्राजक्तसडा.. त्याक्षणी अगदी राणीच आहोत आपण असं वाटलं..                 तर असा हा मनाला भुरळ घालणारा पारिजातक. त्याने भामेलाही भुरळ घातली आणि कृष्ण...

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं. खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी. घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली. अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत ...

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!                        वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.                        मयुरेश पंडित माझा स...