Skip to main content

मैत्री...

  आज ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार. आज मैत्री दिन साजरा करतात म्हणे! हे मला हल्लीच कळलंय म्हणा.
          मैत्री कोणाशी करावी की जुळावी याचा असा काही ठोक फॉर्म्युला नाही. एखाद्याशी पटलं जमलं की आपोआप जुळते मैत्री!
          पक्के मित्र, जिगरी यार वगैरे संज्ञा या मैत्रीला दिल्या जातात. कृष्ण-सुदामा ही मैत्रीची फेमस जोडी. रंग रूप भाषा जात धर्म लिंग आर्थिक स्थिती काहीही मैत्रीच्या आड येत नाही. ज्याच्याशी wave length जुळली त्याच्याशी मैत्रीचे बंध घट्ट बांधले जातात.
          असं म्हणतात की मित्राला आपण न सांगताच नुसतं पाहून आपल्या मनातील भावना कळतात. काही पठ्ठे तर नुसत्या आवाजाच्या टोन वरून सांगतात काही जण तर कधीकधी सायलेन्स पण ऐकतात आणि म्हणतात " बिनसलंय का काही आज तुझं?" असे हे मित्र!
          जीवाभावाचे, गरजेला धावून येणारे, निर्हेतुक प्रेम करणारे, रडायला खांदा देणारे, ऐकायला कान देणारे, सावरणारे, समजून घेणारे, समजूत घालणारे, रागावणारे, हसवणारे, असे हे मित्र आपल्या आयुष्यात रक्ताच्या, जोडलेल्या आशा सगळ्या नात्यांपेक्षा किती तरी महत्वाचे असतात.
          जे पक्के मित्र असतात, ते कितीही गैरसमज झाले तरी मैत्री तोडत नाहीत. काही काळ अबोला होतो पण होतो नंतर गोडवा. मित्र कोणताही पुढचा मागचा विचार ना करता बोलता येणारी, रडता येणारी अशी जागा. ही जागा प्रत्येकाच्याच आयुष्यात असावी आणि त्याची व्याप्ती अधिकाधिक वाढावी हीच या मैत्रदिनी सदिच्छा ....
       
©उमा जोशी (०५/०८/२०१९)
PC: Google..

Comments

Popular posts from this blog

              प्राजक्त......                  प्राजक्त किंवा पारिजातक एक स्वर्गीय फूल. हिंदू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी एक.  लहानसा केशरी देठ आणि स्वच्छ शुभ्र पाकळ्यांचं हे नाजूक फूल आत्यंतिक सुवासिक असतं. केशरी देखाच्या काही छटा या शुभ्र पाकळ्यांवर पण उमटतात कधी कधी. अत्यंत सुरेख सुगंध, मन प्रसन्न करणारा.                 माझ्या बालपणी मुंबईत आमच्या सोसायटीमध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं. आम्ही बऱ्याच जणी त्याची फुलं वेचायचो. आपल्याला अधिक मिळावीत म्हणून दुसरीला चुकवून लवकर जाणे वगैरे उद्योगही केले. लग्नानंतर सासरी आले. माझं सासर कोकणात त्यामुळे घर; त्याच्या पुढेमागे अंगण सगळं कसं अगदी साग्रसंगीत. घरात प्रवेश करतानाच वाटेवर हा पारिजातक उभा आणि पायाशी प्राजक्तसडा.. त्याक्षणी अगदी राणीच आहोत आपण असं वाटलं..                 तर असा हा मनाला भुरळ घालणारा पारिजातक. त्याने भामेलाही भुरळ घातली आणि कृष्ण...

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं. खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी. घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली. अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत ...

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!                        वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.                        मयुरेश पंडित माझा स...