Skip to main content

आनंद लुटूया....

गेल्याच आठवड्यात मकरसंक्रांत होऊन गेली. आता रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकवाचे समारंभ सुरू राहतील. आपल्या संस्कृतीत समारंभांना विशेष महत्व आहे. प्रत्येक सणाला धरून समारंभ असतोच. हे सगळे समारंभ आपल्याला एकत्र आणतात, संवाद वाढवतात (काही वेळा वादही), आपुलकी माणुसकी समृद्ध करतात.
                       संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या तिळगुळ आणि हळदीकुंकू समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात लुटणाऱ्या वस्तू. महाराष्ट्रात सर्वत्रच बहुदा हा सण थोड्या फार फरकाने असाच साजरा करतात. नवविवाहित स्त्रीच्या विवाहापासूनच्या पहिल्या 5 वर्षात काय वस्तू लुटाव्यात याबद्दल काही अलिखित नियम आहेत. त्यानंतर काहीही लुटावे आपल्याला हवे ते.
                       "अहो यंदा काय देऊ सगळ्या बायकांना संक्रांतीचे वाण म्हणून?" यावर अहोंचे उत्तर, "माझा मोबाईल नंबर दे" हे असले पांचट जोक्स सोशल साईट्स वर मुबलक फिरू लागतात संक्रांत जवळ आली की. काय तर म्हणे माझा नंबर दे! किती चुकीचा संदेश जातो या जोकमधून याचा कोणी विचारच करत नाही, ह्याह्या हसायचं आणि फॉरवर्ड किंवा शेअर करायचा हाच उद्योग! आहे का असले उद्दिष्ट आपल्या सणांचे, संस्कृतीचे?
                       हा वेडेपणा एकीकडे तर दुसरीकडे कोणत्या तरी अमुक अमुक गावात खास विधवांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजनाची बातमी. विधवा ! कोणीतरी जळजळीत अंगार कानावर ठेवावा असा जाणवतो हा शब्द. विगत(दूर) आहे धव(नवरा) जिचा अशी ती,  असा सामासिक विग्रह असलेल्या या शब्दाची सामाजिक व्याख्या मात्र थोडी विचित्र आहे. आपल्या समाजात विधवेला कोणी कुंकू लावत नाही किंबहुना तिने स्वतःनेही ते लावू नये असाच समज आहे. खरं पाहिलं तर एखादीचा नवरा जीवित असण्याचा किंवा जीवित नसण्याचा आणि कुंकू लावण्याचा काही संबंध असू नये असं माझं मत आहे कारण नवरा तिच्या आयुष्यात येण्यापुर्वीपासूनच कुंकू तिच्या आयुष्यात असतंच की! त्यामुळे विधवेला मी तुला कुंकू लावलं म्हणजे तुझा सन्मान केला वगैरे भावना स्त्रियांनी बाळगू नये असं आपलं माझं बाळबोध मत.
                       खरं तर हे वाण लुटणे हा प्रकार बऱ्याचशा स्त्रियांच्या स्टेटसचाही प्रश्न बनतो. सोसायटीत अमकीने ते लुटलं, तमकीने हे लुटलं मग मी का मागे राहावं? किंवा एखादीची परिस्थिती नसेल तरी ती सगळ्या आपल्याला बोलावतात मग आपण नको का त्यांना बोलवायला म्हणूनही बिचारी पदरमोड करून हळदीकुंकू आणि वाण समारंभ करते. खरच पण अशा प्रघातांमुळे सामाजिक दरी वाढू लागेल की काय अशीही शंका येते मनात अनेकदा.
                       "काय लुटावे?" या प्रश्नाला एक सरळ उत्तर असेल ,"जे तुला शक्य आहे ते!" काय वाटुया ? दुःख घेऊया ना सगळ्याची वाटून, उपेक्षा हिरावून घेऊया सर्वांच्या , कमीपणा; मानभंग; मनोभंग; तेजोभंग; अपमान; चिंता दूर करायचा प्रयत्न तर करूयात सर्व मिळून आणि सगळ्या जणी मिळून लुटूया फक्त आनंद आनंद आणि आनंद ....
                       ©उमा 24/01/2019

PC: Google

Comments

Popular posts from this blog

              प्राजक्त......                  प्राजक्त किंवा पारिजातक एक स्वर्गीय फूल. हिंदू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी एक.  लहानसा केशरी देठ आणि स्वच्छ शुभ्र पाकळ्यांचं हे नाजूक फूल आत्यंतिक सुवासिक असतं. केशरी देखाच्या काही छटा या शुभ्र पाकळ्यांवर पण उमटतात कधी कधी. अत्यंत सुरेख सुगंध, मन प्रसन्न करणारा.                 माझ्या बालपणी मुंबईत आमच्या सोसायटीमध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं. आम्ही बऱ्याच जणी त्याची फुलं वेचायचो. आपल्याला अधिक मिळावीत म्हणून दुसरीला चुकवून लवकर जाणे वगैरे उद्योगही केले. लग्नानंतर सासरी आले. माझं सासर कोकणात त्यामुळे घर; त्याच्या पुढेमागे अंगण सगळं कसं अगदी साग्रसंगीत. घरात प्रवेश करतानाच वाटेवर हा पारिजातक उभा आणि पायाशी प्राजक्तसडा.. त्याक्षणी अगदी राणीच आहोत आपण असं वाटलं..                 तर असा हा मनाला भुरळ घालणारा पारिजातक. त्याने भामेलाही भुरळ घातली आणि कृष्ण...

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं. खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी. घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली. अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत ...

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!                        वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.                        मयुरेश पंडित माझा स...