Skip to main content

मन आणि मनांतरे...

व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे आपल्या मराठीत. प्रसंग एकच पण त्याविषयी मनात उमटणाऱ्या भावना या माणसागणिक बदलतात....
         अनेक घटना आपण आठवून पहा. एका अंगाने तिच्याकडे पाहता ती आनंददायी, यशस्वी अशी वाटते तर तिच घटना दुसऱ्या अंगाने अगदी विरुद्ध भावना उत्पन्न करते. म्हणूनच म्हणतात की संकटकाळीच खऱ्या मित्राची परीक्षा होते. " सुख के सब साथी, दुःखमे न कोई " असं उगाच का गायलंय!
         सुखाच्या, आनंदाच्या, यशाच्या, मिळकतीच्या क्षणी अनेक जण जवळ येतात. वाहवा करतात, अगदी गुळाला मुंगळे चिकटावेत तसे. तसंच या यशात वाटेकरी होणारेही असतात. हे  यश आमच्यामुळेच कसे मिळाले हे वाढवून फुगवून सांगणारेही असतात.
         आणि अगदी त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला जो अयशस्वी किंवा पराजित झालेला आहे त्याच्या भोवती सुद्धा मुंगळे असतातच पण ते डंख मारतात. द्वेषाचे विष कालवतात मनात.
         अनेक वेळा आपले कौतुक करणारी व्यक्ती ही आपली आप्त, मैत्र आहे की केवळ जिभेवर साखर आणि मनात हलाहल असलेली आहे हे ओळखणे अतिशय कठीण असते. अशी मायावी मने आपल्या आजूबाजूस खूप असतात. ती पारखता येणं हे एक कसब आहे. मात्र हे कसब अंगी बाणवायाला बराच काळ जावा लागतो. अनेक टक्के टोणपे, अनेक घाव, अनेक जखमा, अनेक व्रण सोसावे लागतात.
         एवढे करूनही अनेकदा अशी व्यक्ती आपण ओळखली तरी आपण काहीही करू शकत नाही.एक तर आपला स्वभाव भिडस्त असतो किंवा ती व्यक्ती प्रभावशाली असते किंवा दगडावर डोकं आपटून घेऊन काही उपयोग नाही हे आपल्याला माहीत असतं.
         पण ही वृत्ती काही एका दिवसात निर्माण होत नाही. ती हळूहळू वाढते. अनेकदा अभिनंदन करतानासुद्धा शालजोडीतले मारणारे असतात. पण हा विचार करत नाहीत की कोणी असंच आपल्याशी वागलं तर?
         अनेकदा काय होतं की समोरच्याचं यश मान्य करण्यासाठी आवश्यक असलेला मनमोकळेपणा आपल्याकडे नसतो. म्हणावं ना की बाबा आहेस तू श्रेष्ठ, वरचढ, कार्यकुशल वगैरे वगैरे. काय बिघडलं? पण नाही माझ्यातला अहंकार मला तसं करण्यापासून रोखतो आणि आपल्या अपयशाला परिस्थिती कशी जबाबदार आहे आणि तो कसा शिरजोर आहे हेच बऱ्याचदा घोकल जातं.
         पण अनेकदा एक व्यक्ती म्हणून विशेषतः एक आई म्हणून मला नेहमी वाटतं की आपण आपल्या बाळाला वाढवतानाच असं वाढवलं तर? की जेणेकरून दुसऱ्याचा आनंद  त्याला आपला  वाटला पाहिजे किमानपक्षी तो  नावडता किंवा क्लेशदायक तरी वाटू नये. गुणग्राहकता, श्रमसंस्कार या गुणांची जोपासना बालपणापासूनच जर केली (म्हणजे जर करू शकलो ) तर वाह काय सुरेख असेल तो समाज! जणू काही
         " अवघा रंग एक झाला,
            आप पर भेद नाही उरला,
            सकळ मेळोनिया केला परमानंद ..."
©उमा: २४/०४/२०१८
            

Comments

Popular posts from this blog

              प्राजक्त......                  प्राजक्त किंवा पारिजातक एक स्वर्गीय फूल. हिंदू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी एक.  लहानसा केशरी देठ आणि स्वच्छ शुभ्र पाकळ्यांचं हे नाजूक फूल आत्यंतिक सुवासिक असतं. केशरी देखाच्या काही छटा या शुभ्र पाकळ्यांवर पण उमटतात कधी कधी. अत्यंत सुरेख सुगंध, मन प्रसन्न करणारा.                 माझ्या बालपणी मुंबईत आमच्या सोसायटीमध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं. आम्ही बऱ्याच जणी त्याची फुलं वेचायचो. आपल्याला अधिक मिळावीत म्हणून दुसरीला चुकवून लवकर जाणे वगैरे उद्योगही केले. लग्नानंतर सासरी आले. माझं सासर कोकणात त्यामुळे घर; त्याच्या पुढेमागे अंगण सगळं कसं अगदी साग्रसंगीत. घरात प्रवेश करतानाच वाटेवर हा पारिजातक उभा आणि पायाशी प्राजक्तसडा.. त्याक्षणी अगदी राणीच आहोत आपण असं वाटलं..                 तर असा हा मनाला भुरळ घालणारा पारिजातक. त्याने भामेलाही भुरळ घातली आणि कृष्ण...

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं. खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी. घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली. अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत ...

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!                        वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.                        मयुरेश पंडित माझा स...