Skip to main content

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं.

खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी.

घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली.

अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत करत होत्या हितगुज करत होत्या. अशाच कोण्या एका घडीला तिच्या पदाराची घडी निसटली आणि तिच्या आयुष्याची घडी परत उस्कटली. निसटलेल्या निरी सोबतच त्याने तिच्या आयुष्यात प्रवेश केला आणि आता ते दोघे मिळून त्यांच्या आयुष्याची घडी बसवत आहेत.

मिळून घडी घालताना तारांबळ उडत होती नेहमी त्यांची. तिने बंद बाजू उजव्या हातात धरली की नेमकी तो पण ती उजव्याच हातात धरी आणि मग पिळ पडू लागला. पिळ वाढत गेले आणि घडी अजून अजून उस्कटत गेली. किती शेव सुटले, किती धागे तुटले याची गणती करणं तिने सोडून दिलं तसंच त्याने पण सोडून दिलं. घडी न घालता तसाच तो बोळा ते दोघे वाहत होते.

आज आई आलीये ती त्यासाठीच. गुंता सोडवायला, घडी नीट घालायला मदत करायला. दोघांनीही अलगद हळुवार हातांनी, फुंकर घातलेल्या मनानी, आणि समजूत पटलेल्या डोक्यांनी घडी घालायला घेतली आणि मग खरच घडी बसली. काही सुरकुत्या दिसतायत पण घडी बसलीये....

© उमा जोशी १८/११/२०१९

PC: Facebook: Yeola Paithani & Silk

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...