Skip to main content

गोल

गोल आणि वर्तुळ! आकारसाधर्म्य असणाऱ्या या दोन आकृत्या भौमितिक दृष्ट्या मात्र भिन्न आहेत. वर्तुळ द्विमितीय आहे तर गोल हा त्रिमितीय. केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा समुदाय दोन मितीत असला की त्याला वर्तुळ म्हणतात आणि तीन मितीत असला तर त्याला गोल म्हणतात. पण दैनंदिन जीवनात मात्र आपण या दोघांचा एकच असा उल्लेख करतो.

गोल! त्याच्या पृष्ठभागावर एका बिंदूपासून सुरुवात केली आपण चालायला तर पुन्हा त्याच बिंदूला येऊन पोहोचतो. सतत त्याच त्याच मार्गावरून फिरत राहतो आपण गोलाकार वर्तुळाकार. जन्म जरा मरण आणि पुन्हा जन्म आयुष्याचं हे चक्र असंच चालू आहे अखंडित अविरत. चक्र वर्तुळाकार म्हणजे गोलच की!

आपला जन्म होतो तोच मुळी आईच्या गोल अशा उदरात. तिच्या गोलाकार स्तनातून पाझरणाऱ्या अमृताचे पान करीतच आपण मोठे होतो. गोल वर्तुळ त्याचा परीघ आणि त्या परिघात येणाऱ्या अनेक गोष्टी, वस्तू आणि माणसं ही सारी आपलीच तर असतात. आपण केंद्रस्थानी राहून त्यांना एका ठराविक अंतरावर ठेवतो अगदी आपल्याही नकळत!

गोल काहीवेळा तो भरीव असतो आणि काही वेळा पोकळ असतो. आपल्या डोक्यासारखा! काहीवेळा उगाचच अनेकानेक विचारांनी नुसतं भरून राहतं नाहीतर अगदी रिकामं! जणू काही सगळा केरकचरा आताच झाडून टाकलाय!

मानवी उत्क्रांतीत या गोलकाराला फार महत्व आहे. माणसाला चाकाचा शोध लागला आणि त्याच्या प्रगतीला गती मिळाली. गोल गोल फिरणाऱ्या भिंगाऱ्यांसारखी ही चाकं मग माणसाच्या पायाला चिकटली आणि माणूस सतत इकडून तिकडे फिरू लागला. अन्नासाठी, पैशांसाठी, प्रगतीसाठी...

एका ठिकाणाहून सुरुवात करून पुन्हा त्याच ठिकणी येणं याला एक आवर्तन म्हणतात. आपण देवाला प्रदक्षिणा घालतो ती सुद्धा एक आवर्तनच की. अशीच अनेक विचारांची कृतींची कितीतरी आवर्तनं आपण आपल्या आयुष्यारूपी आवर्तनात करत असतो.

दिवसामागून रात्र आणि रात्रीमागून दिवस हे नित्याचे आवर्तन. ऋतूंचे चक्र हे अजून एक आवर्तन. पुन्हा पुन्हा तेच तेच एका बिंदूपासून सुरू होऊन पुन्हा त्याच बिंदूला परत येऊन मिलन म्हणजेच गोलाकार चलन. या आवर्तनात बदल होत नाहीत आणि सृष्टीच्या आवर्तनात तर नाहीच नाही. ते जर झाले तर मात्र वाटोळ झालंच म्हणून समजावं! इथेही पुन्हा गोलच.

गोल गोल बोलू नकोस काय ते नीट सांग असं आपण अनेकदा म्हणतो. याचा काय बरं अर्थ असेल? गोल गोल बोलणं म्हणजे तीच तीच गोष्ट सरळ न सांगता फिरवून सांगणं. काही वेळा अशा सांगण्यात विभ्रम निर्माण करण्याचा हेतू असतो. जेणेकरून समोरची व्यक्ती त्या गोलात घोळात गुरफटून आपल्याला हवा तसा प्रतिसाद देईल.

या गोलाशी आपले फार घट्ट नाते आहे. बालपणी खेळलेल्या आईचं पत्र हरवलं चा गोल असो किंवा लग्नमांडवात अग्निभोवती जोडीदारासोबत घेतलेले सात फेरे असोत. साताजन्माचं बुकिंग करण्यासाठी वडाला घातल्या जाणाऱ्या प्रदक्षिणा आणि गुंडाळला जाणारा धागा दोघेही गोलकारच अन अंती सरणावर चढल्यावर अग्निपूर्वी वंशजाने घातलेली उलटी का असेना पण गोलच प्रदक्षिणा.

हा गोल जितका लहान तितकं व्यक्तिमत्व संकुचित समजलं जातं. आत्ममग्नता अधिक असलेल्या मंडळींचा परीघ खूप लहान असतो. याउलट दिलखुलास जगणारी, सर्वाना आपलंसं करू पाहणारी मंडळी आपल्या परिघाची त्रिज्या इतकी मोठी ठेवतात की जणू सारे विश्वच कवेत घ्यायचे आहे. कवेत म्हणजेच मिठीत. दोन्ही हात पसरून समोरच्याला विळखा घालणारी ही प्रेमळ क्रिया त्या व्यक्तिभोवती एक प्रेमाचं, विश्वासाचं, सौख्याचं, सख्याचं कडंच बनवते. कडं तेही गोलच की!

जसं आपण आपल्याभोवती एक वलय निर्माण करतो तसंच जगही(पुन्हा गोलच) आपल्याभोवती त्याचं असं एक वलय तयार करतं. जर ही दोन्ही वलयं एकमेकांत बेमालूमपणे मिसळली तर जगण्याचे आनंदी वर्तुळ पूर्ण होऊ शकेल. नाही का?

ही सारी आपण आपल्या बाहेरील वर्तुळं पाहतोय एक वर्तुळ आपल्या आतही दडलेलं आहे. दिसत नाही पण आहे. बिंदूपासून सुरुवात झालेलं हे अंतरवर्तुळ त्याचा परीघ रुंदवण्यासाठी आतुर असतं. पण  तो परीघ रुंदवणं हे त्या वर्तुळाच्या कक्षेत नाही तर ते आपल्या हातात आहेत. किंबहुना मनात किंवा विचारात आहे. हे वर्तुळ संवाद साधतं स्वतःचा स्वतःशीच. आपल्या जमाखर्चाची नोंदवही म्हणजेच हे वर्तुळ.

स्वतःचा स्वतःशी असणारा हा संवाद जेव्हा अधिकाधिक प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण होईल तेव्हाच आपला आत्म्याने परमात्म्याला जाणण्याचा प्रवास सुकर होईल. ही प्रक्रिया म्हणजे सुद्धा एक आवर्तनच. परमात्म्याने आत्म्याला शरीररूपाने पृथ्वीवर(गोलच ना ती) पाठवतो आणि शरीर म्हणजेच जीव आपल्या कर्माप्रमाणे शिवाच्या पायाशी पुन्हा लीन होतो. हे जणू काही अंतिम वर्तुळ आहे ज्याची परिपूर्तता हे प्रत्येक जीवाचे इप्सित असले पाहिजे.

असो काहीही ते वर्तुळ अथवा गोल,
आवर्तनांचाच घालायचा आहे मेळ.
खालचे वर वरचे खाली चाललासे खेळ,
रहाटगाडगं आयुष्याचं कोणासही कसे चुकेल?

© उमा जोशी १९/०१/२०२०
PC: Google

Comments

  1. फारच छान.... शब्द शब्द जोडून बनलेले शब्दजाल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...