Skip to main content

चौकट....

चौकट, पत्त्त्यांमधला की स्त्रीलिंगी? दरवाजाची, खिडकीची, तसवीरीची, रुढींची, परंपरांची, कायद्याची, संस्कारांची, तुझी, माझी, आपल्या साऱ्यांची....
                   चार बाजू आणि चार शिरोबिंदू यांनी बंदिस्त असलेली बहुभुजकृती, चौकोन-चौकट. मग कधी तिच्या चारही बाजू सारख्या लांबीच्या असतात तर कधी समोरासमोरील सारख्या असतात तर कधी चारही बाजू असमान असतात. पण आकार चौकोनीच.
                   चौकटीत असणं काहींना रुचतं; सुरक्षित वाटतं तर काहीजण चौकट मोडून उधळून चौखूर (इथेही ४) धावत सुटतात. आता चौकट मोडावी का विस्तारावी हा कळीचा प्रश्न आहे. पण विस्तार हा नेहमी जीवनदायीच असतो नं! मग मोडण्यापेक्षा चौकट विस्तारणं नेहमीच स्वागतार्हच नाही का?
                   सनातन वैदिक संस्कृती लाभलेल्या आपल्या हिंदुस्थानात आपल्या या अभ्यासू पूर्वजांनीदेखील काही चौकटी सांगितल्या आहेत. चार पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम व मोक्ष, चार आश्रम: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, चार वर्ण: ब्राह्मण, क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र.
                   यांत 'धर्माला' मान्य असलेला 'काम' पूर्ण करण्यासाठी 'अर्थ' कमवून 'मोक्षाची' कास धरायची आहे. हे साधणं तसं अवघडच कारण काम आणि अर्थ हे सद्सद्विवेकावर भारी पडू शकतात. सद्सद्विवेकाला ग्रासणारे राहुकेतूच जणू ते.
                   असं असलं तरीही ही चौकट अखंड अबाधित ठेवायची आहे ती चार आश्रमांच्या माध्यमातून आणि चारही वर्णातील मंडळींनी! वैदिक काळात चातुर्वर्ण्यव्यवस्था ही जन्मावर नव्हे तर कर्मावर आधारित होती आणि तीच योग्य नाही का?
                   आपण आहोत ती सृष्टी सुद्धा एक चौकटच आहे. लांबी, रुंदी, उंची (किंवा खोली) आणि चौथी मिती म्हणजे काळ (वेळ). या चौथ्या मितीला भेदणं, पार करणं किंवा गरजेनुसार जोड-मोड करणं अजून तरी मानवाला जमलेलं नाही. काळाच्या पार मागे किंवा पुढे अजून तरी आपल्याला जाता आलेलं नाहीये त्यामुळे ही चौथी मिती अजून तरी अभेद्यच राहिली आहे.
                   आपण दिवसभर खूप वणवण करतो पण घरी आल्यावर कसं बरं वाटतं! दरवाज्याची चौकट ओलांडून आत आलो की कसं आश्वस्त वाटतं. चार भिंतींची ऊब आपल्याला सुखावते. कितीही काहीही म्हटलं तरी ही चार भिंतींची चौकट आपल्याला सुरक्षिततेची भावना देते, आश्वस्त करते.
                   पारा जमिनीवर पडला सगळीकडे विखुरतो किंवा पाणी जमिनीवर सांडलं तर सगळीकडे पसरतं म्हणून त्यांना अडवायला किंवा सांभाळायला चौकटरुपी भांडं गरजेचं असतं. अगदी तसंच आहे मानवी मनाचं. सोडून दिलं तर ते चौखूर उधळले, सगळी व्यवस्थाच बिघडेल त्यामुळे. तर तसं होऊ नये म्हणूनच संस्कारांची, नियमांची कायद्याची चौकट!
                   ही चौकट मोडणारे इतिहास घडवतात असं म्हणतात. कदाचित तो इतिहास गौरवशाली असेल किंवा लज्जास्पद असेल. गौरवशाली इतिहास घडवणारे चौकट मोडत नाहीत तर ती विस्तारतात आणि दुसऱ्या विषयी न बोललेलंच बरं. शहण्यास शब्दांचा मार!
                   आपणही आपली चौकट विस्तारूया न. सर्वसमावेशक अशी एकच मोठी चौकट बनवूया. ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या प्रमाणे 'हे विश्वची माझे घर' बनवूया. सगळे मिळून एकत्र पुढे जाऊ.
                   ना तुम तुम रहो,
                   ना मैं मैं रहूँ।
                   सब साथ मिलके,
                   चलो हम बनें।।
© उमा जोशी १३/०३/२०२०


PC:  Google..

Comments

  1. waah.. very aptly written. Appreciate the language ..loved it

    ReplyDelete
  2. Kharach aplya chouktit sarvsamaveksta asavi. Very well written dear

    ReplyDelete
  3. आपली चौकट विस्तारुया. हे वाक्य जास्त भावलं.

    ReplyDelete
  4. सुंदर मांडणी.. चौकट विस्तार फारच छान

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

              प्राजक्त......                  प्राजक्त किंवा पारिजातक एक स्वर्गीय फूल. हिंदू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी एक.  लहानसा केशरी देठ आणि स्वच्छ शुभ्र पाकळ्यांचं हे नाजूक फूल आत्यंतिक सुवासिक असतं. केशरी देखाच्या काही छटा या शुभ्र पाकळ्यांवर पण उमटतात कधी कधी. अत्यंत सुरेख सुगंध, मन प्रसन्न करणारा.                 माझ्या बालपणी मुंबईत आमच्या सोसायटीमध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं. आम्ही बऱ्याच जणी त्याची फुलं वेचायचो. आपल्याला अधिक मिळावीत म्हणून दुसरीला चुकवून लवकर जाणे वगैरे उद्योगही केले. लग्नानंतर सासरी आले. माझं सासर कोकणात त्यामुळे घर; त्याच्या पुढेमागे अंगण सगळं कसं अगदी साग्रसंगीत. घरात प्रवेश करतानाच वाटेवर हा पारिजातक उभा आणि पायाशी प्राजक्तसडा.. त्याक्षणी अगदी राणीच आहोत आपण असं वाटलं..                 तर असा हा मनाला भुरळ घालणारा पारिजातक. त्याने भामेलाही भुरळ घातली आणि कृष्ण...

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं. खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी. घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली. अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत ...

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!                        वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.                        मयुरेश पंडित माझा स...