Skip to main content
कृष्ण-सुदामा भेट....
              सांदीपनी मुनींच्या आश्रमात भेटलेले हे दोन जीव. एक राजपुत्र तर एक गरीब ब्राह्मण. खरं पाहता त्याच्यात मैत्री व्हावी असं काही साम्य नव्हतंच. पण मनाच्या गाठी पडल्या की मैत्री होतेच.
             अतिशय साधा सरळ गरीब स्वभावाचा सुदामा आणि लाघवी मनकवडा असा श्रीकृष्ण. लोभस मैत्री आणि याचे साक्षीदार उद्धव आणि बलराम. चौघे असायचे एकत्र पण मने जुळली ती कृष्ण सुदामाची.
             जगराहाटीप्रमाणे शिक्षण संपले आणि सारे पांगले. अनेक वर्षे गेली मध्ये. दरम्यान राम, कृष्ण मथुरा सोडून द्वारकेला आले. सगळ्यांचे संसार बहरले राज्य सुरळीत चालू होतेच. जगभर डंका होता द्वाराकेचा.
             पण या सगळ्या काळात काही सुदामा कृष्ण भेटल्याची नोंद नाही. म्हणजे द्वारकेला आल्यावरही खूप वर्षांनी ते दोघे भेटले असावेत. यातून काय कळतंय म्हणजे मला हा ते सांगते.
             सुदामा पहिल्यापासूनच परिस्थितीने गरीब. त्यात मग लग्न संसार मुले बाळे यात गुंतला. आपल्यापरीने गाडा ओढत होता किंवा प्रयत्न करत होता. तेव्हाही त्याला ठाऊक होतंच की आपला मित्र कृष्ण राजा आहे. खूप श्रीमंत आहे. तो आपल्याला सहज मदत करेल. पण म्हणून काय तो लगेच  नाही गेला कृष्णाकडे. स्वतःचे प्रयत्न त्याने सुरूच ठेवले.
             या उलट कृष्णाचं पाहुयात. तो तर काय साक्षात भगवंतच. त्रैलोक्यात काय घडतंय हे एका ठिकाणी राहून पण ओळखणारा. त्याला ककाय कळलं नसेल आपलं मित्र सुदामा अडचणीत आहे ते?  मनात आणलं असतं तर क्षणात त्याने सुदाम्याच्या परिस्थितीचा कायापालट केला असता पण त्याने तसं नाही केलं.
             अनेक वर्षांनी मग पुढे कधीतरी सुदम्याच्या पत्नीने त्याला त्याच्या राजा मित्राकडे मदत मागायला पिटाळले. रिकाम्या हाती कसे जायचे म्हणून पोह्यांची पुरचुंडी सोबत दिली. तिची अपेक्षा होती की आपल्या पतीचा मित्र राजा आहे तर तो आपली मदत करेल. आणि सुदामा निघाला कृष्णभेटीला.
             द्वारकेत आला सुदामा. मित्राला भेटला. त्याच्या प्रेमाने भरून पावला. अगत्याने सुखावला. पण त्याचा धीर होईना मित्राकडे मदतीचा शब्द टाकायला. खरं तर कृष्णाला सगळं कळलं होतच की. वहिनीने दिलेलं पोहे स्वीकारून आनंदाने खाऊन मन भरून आलं भगवंताचं. त्याने सुदाम्याला न मागताच सारं काही दिलं. प्रेमाने त्याची(सुदाम्याची) झोळी काठोकाठ भरली.
             तर मंडळी ही तुम्हाला माहीत असलेली कथा सांगून मला काय साधायचं आहे? ते म्हणजे या मैत्रीतलं मला जाणावलेलं अध्यात्म. पहा हा सुदामा तडक नाही गेला भगवंताकडे. प्रयत्न करीत राहिला आणि शेवटी पत्नीने आग्रह केला तेव्हा गेला. म्हणजे भगवंताच्या वाटेवर जाण्यासाठी प्रेरकाची गरज असते. प्रयत्न आहेतच पण सर्वसाक्षी भगवंतांचे अधिष्ठानही हवेच. यात सुदाम्याचा भगवंतावर विश्वास नाहीये असं नाही पण तो जरा मागे पडतोय एवढंच. तसच श्रीकृष्णाचे. त्याने स्वतःहून नाही सुदाम्याला मदत केली सुदामा त्याला शरण आला तोंडाने नाहीं पण डोळ्याने कदाचित बोलला आणि मगच भगवंताची त्यावर कृपा झाली. म्हणजे आपण जे म्हणतो ना देवाला सगळं दिसत तो करेल सर्वकाही ठीक तर ते तसं नसावं. देवाला शरण गेलं पाहिजे म्हणजे तो नक्की सर्वकाही ठीक करेल.....
             बोला गोपालकृष्ण महाराज की जय !!!

©उमा जोशी.
PC: राही टिकम करंजे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

              प्राजक्त......                  प्राजक्त किंवा पारिजातक एक स्वर्गीय फूल. हिंदू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी एक.  लहानसा केशरी देठ आणि स्वच्छ शुभ्र पाकळ्यांचं हे नाजूक फूल आत्यंतिक सुवासिक असतं. केशरी देखाच्या काही छटा या शुभ्र पाकळ्यांवर पण उमटतात कधी कधी. अत्यंत सुरेख सुगंध, मन प्रसन्न करणारा.                 माझ्या बालपणी मुंबईत आमच्या सोसायटीमध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं. आम्ही बऱ्याच जणी त्याची फुलं वेचायचो. आपल्याला अधिक मिळावीत म्हणून दुसरीला चुकवून लवकर जाणे वगैरे उद्योगही केले. लग्नानंतर सासरी आले. माझं सासर कोकणात त्यामुळे घर; त्याच्या पुढेमागे अंगण सगळं कसं अगदी साग्रसंगीत. घरात प्रवेश करतानाच वाटेवर हा पारिजातक उभा आणि पायाशी प्राजक्तसडा.. त्याक्षणी अगदी राणीच आहोत आपण असं वाटलं..                 तर असा हा मनाला भुरळ घालणारा पारिजातक. त्याने भामेलाही भुरळ घातली आणि कृष्ण...

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं. खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी. घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली. अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत ...

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!                        वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.                        मयुरेश पंडित माझा स...