Skip to main content
पाऊस येताना.......

  आज सकाळी उठल्यापासूनच तिचं  बिनसलं होतं. जीवाची नुसती घालमेल होत होती. काय होतंय हे मात्र काही तिच्या लक्षात येत नव्हतं. रोजच्या सवयीने सगळी कामं आटोपली जात होती. त्यात काहीच कसूर नव्हती की गडबड सांडलवंड नाही. सगळं कसा अगदी आखून नीट असंच. पण मन मात्र उद्विग्न.
                 काय काय सुरू होतं मनात काहीच नीटसं कळत नव्हतं. का आज असं आपलं मन बंद पुकारतेय हे पण काही कळेना. भांडण झालं नाही की रुसवा , अबोला काहीच नाही या गेल्या काही दिवसात. तरीही ही जीवाची तगमग का होतेय हेच कळत नव्हतं आणि त्याचा च जास्त त्रास होत होता.
                 एकीकडे जीवाला ही अशी आच लागलेली आणि दुसरीकडे बाहेरही नुसतं गरम गरम. काहिली झालेली नुसती जीवाची. इतकं सगळं उष्ण झालेलं की चालताना ठाई ठाई मृगजळ दिसत होतं. उष्म वात आणि किरणांचे अपवर्तन यांमुळे सुरू होता हा मृगजळाचा खेळ! सृष्टी आणि मन यांचा एक गुप्त करारच झालाय जणू! ही भौतिक मृगजळे जणू मनाच्या मृगजळाला आव्हानच देत होती. अशी काही विचित्र दोलायमान अवस्था आणि त्यात हा चिकचिक करणारा घाम.
                 तशातच ऑफिसची कामंसुद्धा अगदी रोबोटप्रमाणे बिनचूक सुरू होती. मनातली आंदोलनंदेखील वाढत होती. काय काय आणि कसलं कसलं म्हणून लक्षात राहिलेलं परत परत उसळून वर येत होतं आणि परत बसत होतं. तशातच आज सखी पण नाही. कोणाला आणि काय बोलू? इथे तिचं तिलाच कळत नव्हतं काय सुरु आहे ते?
                 संध्याकाळ झाली तशी अनामिक अशी हुरहूर वाटायला लागली. आता उष्मा पण वाढला आणि हवेत दमटपणा पण. अंधारून यायला सुरुवात झाली तशी ती अजूनच बेचैन होऊ लागली. कशीबशी घरी पोहोचली. चहाचं आधण ठेवलं. कितीतरी वेळा चेहऱ्यावर पाणी मारलं पण छे तगमग काही कमी होईना.
                 तो आला. चहाच्या निमित्ताने दोघे समोरासमोर बसली. गॅलरीत खुर्च्या टाकून. लांबवर नजर शून्यात नजर लावून काय पहात होती ती? त्याने काहीच विचारलं नाही. फक्त आपला आश्वासक हात तिच्या हातावर ठेवून नजरेनेच पुसलं तिला,"काय गं?" अन अचानक गार झुळूक आली, मेघ दाटले आणि कुंद वातावरणातच पाऊस आला....

©उमा जोशी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...