Skip to main content
*शक्तीचा जागर आणि विजयाची दशमी*


             गेले दहा दिवस म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत आणि आज दशमी म्हणजे दसरा आपण सर्वजण जगन्मातेची आदिमायेची आपापल्या परीने उपासना करत आहोत. अनेकविध नावे आणि रूपे असलेली ही जगदंबा आपली साऱ्यांचीच जननी आहे तिच आहे जी आपल्याला संकटातून बाहेर येण्याची प्रेरणा देते.
                 महिषासुराचा वाढलेला उत्पात जेव्हा देवांना थांबवणे शक्य झाले नाही तेव्हा त्रिदेवांनी आपापल्या अंशातून एकत्रित अशी या दुर्गेची निर्मिती केली आहे. त्यामुळे इथे एक लक्षात घेतले पाहिजे की हे ultimate स्रीरुप जे आहे ते त्रिदेवांचे सार आहे आणि म्हणूनच स्त्री ही जन्मदात्री असते, पालनकर्ती असते तसेच चुकांना शासनही करते.
                 तर अशी ही महिषासुरमर्दिनी जिने सतत नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला आणि पृथ्वीला त्याच्या त्रासातून मुक्ती मिळवून दिली. मग एक प्रश्न उरतो की ही नवनिर्मिती कशासाठी? त्रिदेवांना एकत्र येऊन महिषासुराचा निःपात करता आला असता ना? मग देवी का निर्मिली? मला असं वाटतं की तिघांनी एके ठिकाणी येणं आणि संगनमताने असुराचा नाश करणं हे वाटतं तितकं सुलभ नाही. मुळात ते तिघे सुप्रीम देव असले तरी त्यांच्यात एकमत होईलच असे नाही. मतभेद किंवा कृती करण्याच्या तंत्रात भेद असू शकतो आणि तेवढाही वेळ वाया जाऊ नये म्हणून कदाचित तिघांचेही उत्तमोत्तम गुण एकत्र करून (आणि दोष वगळून)दुर्गेची निर्मिती झाली असावी जेणेकरून वेळेचा आणि शक्तीचा अपव्यय टाळून महिषासुराचा वध व्हावा, जसा की तो झालाच.
                 तर मंडळी या नऊ दिवसात काय काय बदल झालेले दिसतात? एकतर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. पाऊस सरून ऊन पडायला सुरुवात झालेली असते. सर्वत्र हिरवळ असते. शेतं पिकून तरारून वर आलेली असतात. जरा मोकळा अवधी असतो सर्वांकडे. अशातच देवीची आराधना म्हणजे उत्साहाला उधाणच नाही का? तर आशा आल्हाददायक वातावरणात हा नवरात्रोत्सव सुरू होतो. देवीची प्रतिष्ठापना आरत्या पूजा नैवेद्य आणि मुख्य म्हणजे रात्रीचा गरबा!
                 आपल्या संस्कृतीतील बहुदा सर्वच सण समारंभ हे सर्वांनी एकत्र येऊन साजरे करावयाचे असतात. त्यातून संघटन शक्तीचे महत्वच आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आहे. त्रिदेवांनी पण आपल्या शक्ती एक केल्या तेव्हाच असुराचा निःपात शक्य झाला. संघटित राहाल तर वाढाल ; वाचाल, विस्कळीत झालात तर मोडाल असाच तर संदेश नसेल ना त्यात!
                 देवीने अत्यंत तडफेने सातत्याने युद्ध करून महिषासुरला संपविले यातून काय बरे बोध घ्यावा? तर सातत्य आणि तडफ. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची जिद्द. मग ती फक्त स्त्रीतच असावी असं नाही पुरुषही अन्यायाचे बळी होतातच की! कोणतेही संकट असो न घाबरता न डळमळता सातत्याने आणि निकराने सामना केला तर यश नक्की आहेच.
                 आता आला तो दसरा! विजयादशमी! महिषासुराचा वध झाला तो दिन, रावणाचा वध झाला तो दिवस. सुष्टांचा दुष्टांवरील विजयाचा दिवस! सातत्याने आपणही दुष्प्रवृत्ती, दुर्विचार, दुराचार यांना बळी पडत असतो किन्वा ते सहन करत असतो. असं म्हणतात की त्रास देणारा जितका दोषी त्याहूनही तो सहन करणारा अधिक दोषी. त्यामुळे आपल्या आतील दूषप्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी, आपल्या आजूबाजूला चाललेले दुराचार थांबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न, लढा, प्रसंगी अगदी शस्त्रही उचलावे लागले तरी चालेल पण आपणही विजयाच्या 'दशमीची' चव चाखूयाच.....

©उमा जोशी. ०८/१०/२०१९(विजयादशमी)


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...