Skip to main content

मनाच्या काठावर...

अशा वळणावर येऊन थांबलंय आता आयुष्य
जणू भासतो संपलाच आहे रस्ता
पण तरीही पुढे जाण्याची ओढ...

असंच नव्हतं का मागे सुद्धा वाटलेलं एका वळणावर
अंधार दाटला होता सर्वत्र आणि वाटा भासल्या होत्या थिजलेल्या...

उचंबळून म्हणून काही येतच नाही आताशा
धुमारे न फुटती कशाला आता
दुःखाला कोंब येतात आणि सुखाचा शिशिर सरेना...

कितीतरी प्रसंग आणि आठवणी पानगळतीप्रमाणे गळून पडली
रिते झाले मन सारे आणि बुद्धीही आता थकली..

हळूच कधीतरी डोकावते सोनेरी किरण सुखाचे
चांदण्या कैक लुकलूकतात आणि हलकेच चांदणे पाखर घालते...

वाटे कधी मिळावी पुन्हा साथ अशीच जीवाला
पण आताशा त्या वाटण्यातही जोर नाही उरला..

कळतच नाही कोण करतंय ही मागणी? मी? माझं शरीर? की मन माझं?
गुंत्यात या साऱ्या अडकून पडलेल्या जीवाला काहीच उमजत नाही...

वाटते मौज मनाला, बंधन झुगारून देण्यात
आणि मिळवण्यात आनंद उपभोगाचा
कारण आताशा जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्याना पेलेनासं झालय जणू...

आजही खुणावतात तीच ती प्रलोभने, वेडावायची जशी पूर्वी अगदी तशीच.
पण आता मात्र त्यांचं वेड लागत नाही ,उलट सावधपणे खेळ खेळला जातोय त्यांच्यासोबत अगदी नकळत पणे...

पण नकळत तरी कसं म्हणावं या खेळाला? उतरती कागदावर जी अक्षरे मीच ना ती लिहिली आहेत?
का आताशा माझा मनावर आणि मेंदूवर माझ्याच ताबा नाही राहिला?

खरच असं कधीतरी मन आणि बुद्धी बाजूला काढून  ठेवलं तर कसं वागेल हे शरीर?
मौज वाटतेय मला या कल्पनेची पण मन मात्र सूचक हसतंय...

कळूनही न कळण्याचा आव आणणारी मनोबुद्धि ही किती अकल्पित आणि अतिविचारी आहे नाही...

इथे आपणच आरोपी, आपणच वकील, आपणच फिर्यादी आणि आपणच न्यायाधीश.
काय सुरू आहे या न्यायालयात? कोणता न्याय मागतेय मी? की न्याय मागण्याच्या पडद्यामागे अन्यायाचेच समर्थन सुरू आहे?

कठीणच आहे हा गुंता पण सुटेल अशी आशा आहे, प्रयत्न सोडणाऱ्याच्या पदरी कायमच घोर निराशा आहे.

अपल्यावरही आहे एक न्यायाधीश, जो मांडतोय जमाखर्चाचे हिशोब
येतोय तो आयुष्यात आपल्या फक्त कधी कुठे कसा नाही सांगता येत.

खूप झाले म्हणता म्हणता लक्षात आता येत आहे
हे तर काहीच नाही अजून खूप काही बाकी आहे..

आता भार तुम्हावरच सावळ्या, दयाघना करी सांभाळ, मी नसे तुझी भक्त अपार
परी पार करण्या हा भवताल दे मला हिंमत अपार...

© उमा जोशी ०९/१२/२०१९

PC: Mr. Tanmay Joshi

Comments

  1. खूप छान
    हे असलं द्वंव प्रत्येकाच्या मनात रोज
    ह्यात कोणीच फिर्यादी नाही व सगळेच न्यायाधिश

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

              प्राजक्त......                  प्राजक्त किंवा पारिजातक एक स्वर्गीय फूल. हिंदू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी एक.  लहानसा केशरी देठ आणि स्वच्छ शुभ्र पाकळ्यांचं हे नाजूक फूल आत्यंतिक सुवासिक असतं. केशरी देखाच्या काही छटा या शुभ्र पाकळ्यांवर पण उमटतात कधी कधी. अत्यंत सुरेख सुगंध, मन प्रसन्न करणारा.                 माझ्या बालपणी मुंबईत आमच्या सोसायटीमध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं. आम्ही बऱ्याच जणी त्याची फुलं वेचायचो. आपल्याला अधिक मिळावीत म्हणून दुसरीला चुकवून लवकर जाणे वगैरे उद्योगही केले. लग्नानंतर सासरी आले. माझं सासर कोकणात त्यामुळे घर; त्याच्या पुढेमागे अंगण सगळं कसं अगदी साग्रसंगीत. घरात प्रवेश करतानाच वाटेवर हा पारिजातक उभा आणि पायाशी प्राजक्तसडा.. त्याक्षणी अगदी राणीच आहोत आपण असं वाटलं..                 तर असा हा मनाला भुरळ घालणारा पारिजातक. त्याने भामेलाही भुरळ घातली आणि कृष्ण...

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं. खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी. घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली. अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत ...

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!                        वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.                        मयुरेश पंडित माझा स...