Skip to main content

परिवर्तन

 काल सहज सुधा मूर्तींचा एक लेख वाचनात आला. 'विशीतील आदर्शवाद आणि चाळिशीतील वास्तवतावाद'! 

खरंच आहे ऐन उमेदीत विशीत आपण फारच आदर्शवादी असतो. तारुण्यातील उसळणारं रक्त असेल, नुकताच लागलेला शैक्षणिक स्वातंत्र्याचा वारा असेल किंवा अनुभवांची तोकडी शिदोरी असेल ; कारण काहीही असेल पण त्या वयात आपल्या कल्पना फारच आदर्शवादी असतात हे खरं!

त्याउलट चाळीशीत आपण वास्तव स्वीकारायला सुरुवात करू लागलेले असतो. शिक्षण आणि त्याचे उपयोजन यातील दरी सांधत सांधत जीव मेटाकुटीला आलेला असतो. अनुभवांचं बऱ्यापैकी मोठं आणि जड गाठोडं आता आपल्यापाशी असतं. नोकरी-धंद्यातलेच नाही तर वैयक्तिक आयुष्यातसुद्धा अनेक चढ उतार सहन करून पोळलेले आपण आदर्श सोडून हळूहळू वास्तव स्वीकारायला लागलेले असतो.

आता हे स्वीकारणं काही वेळा जड जातं पण स्वीकारण्यवाचून गत्यंतर नसतं. मागे वळून पाहताना आपल्याच लक्षात येतं की आपण स्वतःविषयी फारच अवास्तव कल्पना बाळगल्या होत्या आणि कितीही काहीही केले तरी पूर्ण होणे शक्य नाही. काही जण हे वास्तव सहज स्वीकारतात तर काही जणांना फार त्रास होतो वास्तव स्वीकारताना.

पण हे वास्तव स्वीकारणं म्हणजेच स्वतःत घडवून आणलेलं परिवर्तनच होय. बदल हा सृष्टीचाच नियम आहे. आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःत बदल घडवून सारी सृष्टी अजूनही टिकून आहे. 'Survival of the fittest' जो काळाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे बदलला तो टिकला , जो नाही बदलला तो मोडला, नामशेष झाला.

म्हणूनच जरं टिकून राहायचं असेल तर बदल, परिवर्तन आवश्यक आहे. मग हे परिवर्तन आपण मनापासून स्वीकारलं तर सोपं होईल आणि आनंददायी होईल आपल्यालाही आणि आपल्या सोबत असणाऱ्यांनाही. परिस्थितीने लादलय म्हणून परिवर्तन करायला गेलो तर कदाचित ती प्रक्रिया क्लेशदायक ठरेल आणि म्हणूनच काळाची पावलं ओळखून वेळीच परिवर्तनशील राहणं हे चांगलंच नाही का?

© उमा जोशी १७/११/२०२०


Comments

  1. वास्तव स्वीकारणं म्हणजेच स्वतःत घडवून आणलेलं परिवर्तनच होय. सुंदर वैचारिक लेखन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...